भारतीय परंपरेत“गुरुपौर्णिमा” हजारो वर्षे साजरी केली जात आहे आणि आजही हा उत्सव टिकून आहे. आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरू या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. शिष्याने ते मान्य केल्यावरच तो कांही तरी शिकू शकतो. एका संस्कृत श्लोकात त्याचे "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।" असे वर्णन करून त्याला नमन केले आहे. यात गुरूला देवतुल्य मानले आहे तर संत कबीर म्हणतात,
"गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागौ पाय।
बलिहारी गुरु आपने गोविंद दीजो बताय।।"
इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरूच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. "परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतो म्हणून तोच जास्त श्रेष्ठ." असे दुस-या एका ठिकाणी म्हंटले गेले आहे. "गुरूबिन कौन बताये बाट, बडा विकट यमघाट।", "बिन गुरु ग्यान कहाँसे पाऊँ" यासारखी कांही नकारात्मक अर्थाची पदेही आहेत. योग्य गुरु भेटल्याशिवाय आपण कांहीच करू शकत नाही असा नकारात्मक संदेश त्यातून दिला जातो आणि आपल्या प्रयत्नातली उणीव झाकायला एक निमित्य मिळते.
महर्षी व्यासांनी सुद्धा एकलव्याच्या गोष्टीतून या मिथकातील फोलपणा दाखवून दिला आहे. गुरु द्रोणाचार्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन तर त्याला मिळाले नव्हतेच, त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले सुद्धा नव्हते. तरीही द्रोणाचार्यांनी कौरव व पांडव या आपल्या शिष्यांना दिलेल्या शिकवणीचे ती अपरोक्षपणे ऐकून आणि तिचे नुसते अनुकरण करून एकलव्याने धनुर्विद्येमध्ये विलक्षण प्राविण्य प्राप्त केले होते. हजारो वर्षे, मानव जातीसाठी नवनवीन शक्यता उपलब्ध करून देणारा दिवस म्हणून गुरु पौर्णिमा ओळखली जाते व साजरी केली जाते. प्राचीन काळाप्रमाणे गुरु-शिष्य परंपरा आज नसली तरी मेंटॉर-मार्गदर्शकाच्या रूपात ती आजही अस्तित्वात आहे. मेंटॉरला शिष्याला वेळ द्यावा लागतो. आपल्याकडील ज्ञान देण्याबरोबरच आपल्या कार्यपद्धतीतून एक आदर्श घालून देणेही महत्त्वाचे ठरते. अनुकरणातून खूप काही शिकता येते. विद्यार्थ्यांला/ शिष्याला येणाऱ्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्याची जबाबदारीही गुरूची असते. या अडचणी केवळ ज्ञानार्जनातीलच असतील असे नाही, तर वैयक्तिक अडचणींवर मात करतानाही मेंटॉरची मदत होते. आपल्या शिष्याला त्याची ध्येये ठरवताना, त्यांचा पाठपुरावा करताना, ते करत असताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाताना मदत करणे हे मेंटॉरचे काम असते. प्रत्यक्ष प्रत्येक विषयातील कौशल्य गुरूकडे असतेच असे नाही, पण योग्य दिशादर्शन करण्याचे काम मात्र गुरू करू शकतात.
आधुनिक गुरू कधी एखादा शिक्षक असतो, तर कधी आपल्या व्यवसायातील कुणी बुजुर्ग व्यक्ती असते. कधी कधी आपल्यापेक्षा पुढच्या वर्षांमध्ये शिकणारा एखादा विद्यार्थीसुद्धा गुरू बनू शकतो. आपल्याबरोबर काम करणारा आपला सहकारीसुद्धा ही भूमिका पार पडू शकतो. गुरू आणि शिष्य एकाच ठिकाणी असतील असेही नाही. दूरच्या विद्यापीठातील प्राध्यापक एखाद्या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन करू शकतात. सतत भेटले पाहिजे असे नाही. विशिष्ट कालावधीनंतर गुरू-शिष्याची प्रत्यक्ष भेट झाली तरी चालेल. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकमेकांशी दुरून संवाद साधणेही सहज शक्य असते.
प्राचीन काळाप्रमाणे गुरु-शिष्य परंपरा आज नसली तरी मेंटॉर-मार्गदर्शकाच्या रूपात ती आजही अस्तित्वात आहे. आणि मुख्य म्हणजे हा मेंटॉर- मार्गदर्शक कुठल्याही रूपात भेटू शकतो.‘गुरू’ ही संकल्पना आपल्या देशात फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. स्वत:चे घर सोडून ज्ञानसंपादनासाठी गुरुगृही जाऊन राहणे, ही आपली परंपरा. अशा वेळेस अर्थातच केवळ विद्या प्राप्त होत नसे, तर शिष्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाकडे गुरूचे लक्ष असे. विशिष्ट विद्या आणि त्याबरोबरच आयुष्याला सामोरे जाण्याचे बळ मिळवून शिष्य गुरुगृहातून परत येत असे. वैयक्तिक आयुष्य सुरू केले तरी गुरूविषयी ऋणभावना मनात कायम राही. तसेच आयुष्यातल्या अवघड वळणावर गरज पडल्यास पुन्हा एकदा गुरूकडे धाव घेण्याचीही मुभा होती. एकदा गुरू-शिष्याचे नाते निर्माण झाले, की ते कायम टिकत असे.
विद्यार्जनाप्रमाणेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर ‘गुरू करणे’ आवश्यक असते. संत परंपरेमध्येही गुरूला महत्त्व आहे. त्यामुळेच चांगदेवाचे गुरू नामदेव, नामदेवांचे गुरू ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्ती अशी गुरू-शिष्य परंपरा आपल्याला दिसून येते. कलेच्या क्षेत्रात आजही गुरू-शिष्य परंपरा कायम दिसते. एखादा उत्तम गाणारा ‘कोणाचा शिष्य किंवा शागीर्द’ याची चर्चा असते. वर्षांनुवर्षे गुरूकडून कला अवगत करण्यासाठी धडपडणारे अनेक आजही आपल्याला दिसतात. ही परंपरा मात्र केवळ आपल्याच देशात नाही, तर जगभरात दिसून येते. गुरूची छाप शिष्याच्या हावभावांमध्ये, वागण्यामध्ये, विचार करण्यामध्ये सगळ्यात दिसते. असा गुरूचा शिष्यावर प्रभाव असतो. आपल्या ज्ञानाची, विचारांची, कलेची, नैपुण्याची तसेच आध्यात्मिक शक्तीची पुढली पिढी गुरू घडवत असतो आणि त्यातूनच अनेक विद्या, कला, आध्यात्मिक ज्ञान यांचे जतन होते.
फार पूर्वीपासून आपण गुरूचे महत्त्व जाणले आणि गुरूला समाजात स्थान दिले. आजची स्थिती काय आहे? आज विद्यार्थी शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडे शिकतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक असतात. क्रीडा क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षक असतात. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी
शिकतात, परीक्षा देतात आणि पुढच्या टप्प्यावर पोहोचतात. शिक्षकी पेशा स्वीकारलेले विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान देतात. विद्यार्थी यातून आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे शिकतो आणि
आयुष्यातल्या यशापयशाला एकटाच समोर जातो. काही शिक्षक मात्र केवळ शिकवण्याची दिलेली जबाबदारी पार पडत नाहीत, तर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे, त्यांना येणाऱ्या अडचणींकडे विशेष लक्ष पुरवतात आणि त्या त्या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन करतात. असे दिसून येते की, अशा शिक्षकांची विद्यार्थ्यांवर छाप पडते आणि विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतात. तसेच या विद्यार्थ्यांची प्रगतीही चांगली झालेली दिसून येते. हे शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे गुरू
बनतात.
केवळ एखाद्या विषयाचे ज्ञान मिळवणे पुरेसे नसते. त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले व्यक्तिमत्त्व घडवायचे, तर कुणाचा तरी मदतीचा हात मिळणे आवश्यक असते. आजच्या इंटरनेटच्या युगात, जिथे माहितीच्या जाळ्याच्या आधारे कुठल्याही विषयात आपले ज्ञान वाढवता येते तिथे असा मदतीचा हात देणारे कोण? भले एखाद्या विषयात आपण पुरेसे शिकून तयार झालो, तरी आजच्या जीवनसंघर्षांमध्ये कोणी मार्गदर्शक भेटला तर वाट सुकर बनते. शालेय विद्यार्थिदशेपासून, महाविद्यालयीन शिक्षणात आणि प्रत्यक्ष नोकरी-व्यवसायाला लागल्यावरही अशा मदतीची गरज भासते. म्हणजेच असा मार्गदर्शक, सल्लागार हा आपला ‘आधुनिक गुरू’ (मेंटॉर) असतो. विशेषत: आजच्या शहरी जीवनामध्ये केंद्रित कुटुंबपद्धतीमुळे वडीलधाऱ्या नातेवाईकांशी सहज आणि नियमित संपर्क येत नाही. शेजारपाजारच्या किंवा परिचयाच्या माणसांशी सतत आणि
वैयक्तिक संपर्क नसतो. आजच्या संघर्षमय आणि स्पर्धेच्या युगात आपली प्रगती साधताना मानसिक स्वास्थ्य टिकवायचे, तर कोणी तरी मार्गदर्शक, सल्लागार मिळाला तर खूपच फायदा होतो. त्यामुळे अशा ‘गुरू’चे स्थान आज अधिकच महत्त्वाचे ठरते. पुन्हा एकदा आजच्या युगात गुरूचे स्थान महत्त्वाचे बनले आहे. आजच्या ‘आधुनिक गुरू’च्या संकल्पनेतही गुरू-शिष्य नात्याचे तेवढेच महत्त्व आहे. मेंटॉर या शब्दाचा उगमही एका प्राचीन ग्रीक कथेवर आधारित आहे. ओडीसीअस राजाने युद्धावर जाताना मेंटॉर नावाच्या आपल्या
मित्रावर आपल्या मुलाच्या शिक्षणाची, संरक्षणाची तसेच विकासाची जबाबदारी दिली होती. त्यावरून आजही तशी भूमिका पार पडणाऱ्या आधुनिक गुरूला मेंटॉर म्हटले जाऊ लागले.
परंतु गुरू-शिष्य नात्याचे गुणधर्म मात्र कायम राहतात. सद्गुरूचे वर्णन करताना असे म्हटले जाते की, सद्गुरूमुळे ज्ञान वाढीस लागते, शिष्याचे दु:ख नाहीसे होते, आनंद निर्माण होतो, समृद्धी येते आणि शिष्याची प्रतिभा अभिव्यक्त होते. आजही गुरू हेच करताना दिसतात. म्हणजेच केवळ विद्या देणे हे गुरूचे कार्य सीमित नाही. आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले शहाणपण शिष्यापर्यंत पोहोचवणे हे गुरूचे काम असते. आज विविध शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि व्यावसायिक कंपन्या अशा अनेक ठिकाणी मुद्दाम अशा गुरूंची म्हणजेच मेंटॉरची व्यवस्था केलेली असते. काही शाळांमध्येही शिक्षकांमध्ये ही जबाबदारी वाटलेली
असते. स्वाभाविकपणे असा गुरू मिळाला तर आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होतेच; परंतु प्रत्येकालाच कोणी गुरुस्थानी भेटेल असे नाही. मग अशा कृत्रिम रचनेतून युवा पिढीला मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली तर एक यशस्वी युवा पिढी निर्माण होईल असा यामागचा उद्देश
आहे. हे गुरू-शिष्याचे नाते परस्परविश्वासावर आधारित असते. आपल्या शिष्याला मानसिक आणि भावनिक आधार देण्याचीही गुरूची जबाबदारी असते. वेळोवेळी आपल्या शिष्याच्या प्रगतीचा आलेख त्याच्यासमोर
मांडणे, त्याला त्याच्या चुकांची, त्रुटींची जाणीव करून देणेही महत्त्वाचे असते. गुरू-शिष्य नाते यातून अधिक बळकट होते.
आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर, उदा. विद्यार्थिदशेत किंवा नोकरीच्या सुरुवातीच्या काळात असा सल्लागार किंवा मार्गदर्शक भेटला, तर हे नाते पुढेही कायम राहते. आपल्या शिष्याने कायमस्वरूपी आपली मदत घेत राहिले पाहिजे, अशी गुरूची भूमिका असता कामा नये, किंबहुना आपला धरलेला हात सोडून शिष्याने आपली वाटचाल सुरू ठेवावी असा गुरूचा प्रयत्न असला पाहिजे. एकमेकांशी असलेले नाते कायमस्वरूपी असले तरी आपल्या शिष्याचा झालेला विकास पाहून
गुरूला मिळणारा आनंद हाच खरा होय! शिष्य ज्याला आधुनिक युगात मेंटी म्हटले जाते तो आपल्या गुरूकडून बरेच काही शिकतो. पौगंडावस्थेत, तरुणपणी मेंटॉर (गुरू) मिळाल्याचे खूप फायदे असतात. जगभरात आज या वयोगटाला गुरू मिळावे यासाठी मुद्दाम योजना राबवल्या जातात. आजचे मध्यमवयीन, त्या त्या क्षेत्रातले यशस्वी लोक, बुजुर्ग मंडळी यांच्याबरोबरच सीनिअर विद्यार्थी, मित्र हेही अशी गुरू वा मेंटॉरची भूमिका निभावताना दिसतात. मेंटॉिरगमुळे युवकांचे परस्परसंबंध सुधारतात. कुटुंबातील तसेच मित्रमंडळींमधील नातेसंबंध सुदृढ होतात. प्रत्यक्ष फायदा म्हणून
शैक्षणिक यश अधिक मिळते, नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी दिलेले लक्ष्य साध्य करायला मदत होते. आत्मविश्वास वाढतो. चांगली स्व-प्रतिमा तयार होते. निर्णयक्षमता वाढते. काम करण्याची प्रेरणा मिळते. मानसिक बळ वाढते.
संकटांना सामोरे जाताना एकटेपणाची भावना निर्माण होत नाही. मदत घेताना संकोच राहत नाही. कोणाच्या तरी सल्ल्याने प्रश्न सुटू शकतात असा विश्वास वाटतो. मानसिक आरोग्य टिकण्याच्या दृष्टीने या सगळ्याचा खूप
फायदा होतो.
अनेक चुकीच्या गोष्टींपासून पुढच्या पिढीला दूर ठेवण्याचे काम मेंटॉिरगमधून होते. तरुण व्यसनांकडे वळण्याची
शक्यता कमी होते. त्यांच्यातील आक्रमकतेसारख्या वृत्ती नियंत्रणात राहतात. चुकीची संगत लागत नाही. गुन्हेगारी वृत्ती बळावत नाही. त्यामुळेच समाजातल्या ज्या मुलांना लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी
झगडावे लागले आहे अशांना मेंटॉिरगचा निश्चित फायदा होताना दिसतो. युवा पिढीचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास होण्याच्या दृष्टीने हे गुरू-शिष्याचे नाते उपयोगी आहेच. गुरूलाही याचा फायदा मिळतो. आपले ज्ञान अत्याधुनिक करण्याची संधी मिळते. एक सुदृढ नाते
तयार होते, जे गुरूलाही आधार देणारे असते.गुरुपौर्णिमेचे महत्त्व आजही तितकेच आहे हे या सगळ्यातून पटते. आज आपणहून कोणाचे तरी मार्गदर्शक गुरू – मेंटॉर बनणे, तरुण पिढीला विकासाच्या मार्गावर साहाय्यभूत ठरणे हे महत्त्वाचे आहे. आजच्या आधुनिक युगातील गुरू-शिष्य परंपरेचाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा आढावा.
शुभम रामेश्वर भोंगळे
महाविद्यालयीन जीवनात अनेक पुरस्कार प्राप्त तसेच विविध वृत्तपत्रांतून लेखन, नवोदित कवी, योगशिक्षक व योगसाधक, सध्या योग विषयाचे शैक्षणिक समन्वयक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक येथे कार्यरत .शुभम बरोबर कनेक्ट होण्यासाठी येथे क्लिक करा.
आगामी पोस्टची माहिती प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा.
Write a comment
Dinesh Eknath Sapkale (Sunday, 05 July 2020 06:16)
Of course remarkable..
Trupti Patil (Sunday, 05 July 2020 06:35)
खुप सुंदर लेखन
ashok tayade (Sunday, 05 July 2020 06:45)
beyond the words
Vaibhav 87 (Sunday, 05 July 2020 06:55)
छान लिहाल तू.
गुरु हे प्रेरणा चे असे स्त्रोत आहे
ज्यांच्या कडे पाहिले की झोप येत नाही.( motivate all the time )
अश्या गुरूंना गुरु पौर्णमेच्या हार्दिक शुभेच्छा.
राहुल राजू खरात (Sunday, 05 July 2020 10:09)
खूप छान ��
Shubham Bhongle (Sunday, 05 July 2020 11:43)
Thank you all of you..�
Rahul narkhede (Sunday, 05 July 2020 11:56)
Khup chan aahe shubham
Neha Karekar Gurav (Sunday, 05 July 2020 12:18)
खूप सुंदर लेखन शुभम , रेखीव शब्दात मांडणी ��
Suhas vasave (Sunday, 05 July 2020 12:42)
Why we need mentor(guru) beautifully explained with new and old examples..!!
Ur writing improving day by day....keep it up!!